सोलापूर,दि.9 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत 10 आणि 11 नोव्हेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, आय.टी.आय. टर्नर, सी.एन.सी. ऑपरेटर, मशिनिस्ट, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, बी.एस्सी.., एम.एस्सी, इंजिनिअर अशा प्रकारची एकूण 348 पेक्षा जास्त रिक्तपदे चार उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.