विरोधक दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत…. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे फडणवीस सरकार कटिबद्ध…
मुंबई, दि.२० : न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा.लि., मे. वरद फेरो अलाईज प्रा. लि. आणि राजुरी स्टील अँड ऑलॉय इंडिया प्रा. लि. या तिन्ही कंपन्यांच्या गुंतवणूकीवरून विरोधक शिंदे – फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नसून विरोधक राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. या तिन्ही कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार असून यात होणारी गुंतवणूक ही अमेरिका इंग्लंड, इस्राईल/ युरोप या देशांतून होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांमध्ये संबंधित कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय झाला होता. यामुळे न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा.लि. कंपनीने राज्यात २०००० कोटी तर., मे. वरद फेरो अलाईज प्रा. लि. या कंपनीने १५२० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
या कंपन्यांचे सामंजस्य करार हे डाव्होस, स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित जागतिक परिषदेत संपन्न झाले आहेत. हे सामंजस्य करार होण्याआधी कंपन्यांसमवेत प्रोत्साहनाबाबत चर्चा सुरू होती. विशेषतः या कंपन्या जरी राज्यामध्ये नोंदणीकृत असल्या तरी त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रमाणपत्र दिल्यानंतरच सर्व सुविधांचा लाभ घेता येतो. त्यामुळे अर्धवट आणि चुकीची माहिती घेऊन टीका करणाऱ्या विरोधकांनी राज्याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू नये. डाव्होसवरून शिंदे फडणवीस सरकारने १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणूकीसह १ लाख तरूणांना रोजगार आणला आहे, याकडे लक्ष देणे राज्यासाठी हितावह ठरेल. तसेच या कंपन्यांना जो वित्त पुरवठा होणार आहे, तो बाहेरच्या देशातून होणार आहे.