मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांसोबत उपक्रमांचे आयोजन; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती
मुंबई, दि. 2 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांची क्षमता मतदार जागृतीसाठी उपयुक्त ठरेल हे लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
श्री. देशपांडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, स्वीप सल्लागार दिलीप शिंदे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅ़ड. नरेश दहिबावकर उपस्थित होते.
यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, लोकशाही सुदृढ, बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. निवडणुका यशस्वीपणे आयोजित करणे ही जशी महत्त्वाची बाब आहे, त्याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी मतदार शिक्षण, प्रशिक्षण आवश्यक असून या बाबीकडे भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (स्वीप) कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे या दोन महत्त्वाच्या बाबींकडे आम्ही लक्ष देत आहोत.
गणेश मंडळांनी सामाजिक जाणीवेतून चांगले काम केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जागृतीचा चांगला संदेश जनतेपर्यंत जाऊ शकेल हे ओळखून आम्ही ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम आखला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बंधने पाळत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे.
प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावणे आदीं विषयांवर, घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.
या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार प्रचार केला जाणार आहे. कोरोनाचे नियम पाळून गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहे. त्यामध्येही अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, असेही श्री. देशपांडे म्हणाले.
18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी महत्त्वाची बाब असून त्यासाठी राज्यातील विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेची जागृती करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येत्या शिक्षक दिनी दि. 5 सप्टेंबर रोजी लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशीही माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.