कल्याणराव इंगळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकरांची प्रमुख उपस्थिती
अक्कलकोट, दि.१५ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमन कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमित्त येत्या १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. देवस्थान संचलित मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील कै. इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात गुणीजन सन्मान सोहळा, रक्तदान शिबीर, मोफत होमिओपॅथिक शिबीर, तंत्रनिकेतन मधील माजी विद्यार्थांचा मेळावा, विद्यार्थी करीता कॅम्पस मुलाखत, नाडीतज्ञ डॉ.श्रृती व सुधीर यांचे आरोग्य शिबीर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून छोट्या पडद्यावरील कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मराठी धार्मिक मालिकेतील स्वामी समर्थांची भूमिका साकारलेले मुख्य कलाकार अक्षय मुडावदकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून विश्व अग्निहोत्र फाउंडेशनचे चेअरमन डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, श्री.स्वामी समर्थ समाधी मठाचे चोळप्पा महाराजांचे वंशज प. पू. अण्णू महाराज पुजारी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले उपस्थित राहतील.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील कै. बाळासाहेब इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. यानंतर दीप प्रज्वलनाने व स्वामी समर्थांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल. यानंतर यश कल्याणी सेवाभावी परिवारचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांना समाजरत्न पुरस्कार तर पक्षी मित्र, पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना निसर्गप्रेमी सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यानंतर कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्यावतीने दहावे राष्ट्रीय अक्कलकोट भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. या अक्कलकोट भूषण पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कोलाड रायगड येथील डॉ.तोजोदिन हाफीज, हुतात्मा अपंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे, लातूरचे नाडी तज्ञ डॉ.सुधीर घुगे, आयुर्वेद तज्ञ श्रुती घुगे, मडगाव गोव्यातील स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष जयेश नाईक, डॉ.विजय माटे, चिपळूणचे डॉ.संजय भागवत आदींसह प्राचार्य नागनाथ जेऊरे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त पदाधिकारी आदी उपस्थित असतील. तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन इंगळे यांनी केले आहे.