सोलापूर, दि. 7: जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजने बरोबरच शहरासह ग्रामीण भागात लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेबाबत नियोजन भवन, सोलापूर येथील आयोजित बैठकीत श्री. भरणे होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेची आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, लसीकरणाचे नियोजन करत असताना लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाऊनच्या माध्यमातून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कालावधीत पोलीस प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, पोलीस विभागाने काटेकोर नियोजन करावे.
जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत राहिल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर गरजेपुरताच करावा. हे इंजेक्शन पात्र व गरजू रुग्णांना देण्यात येत असल्याची खातरजमा करावी. जिल्ह्यातील मृत्यूदर संख्या कमी करण्यासाठी वेळेत उपचार करावेत तसेच संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात ऑक्सीजन व रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. याचा वापर शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणेच करावा, असे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले.
यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरासाठी ज्यादा ऑक्सिजन व लसीची मागणी या बैठकीत केली.