सोलापूर, दि, 7 : जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत असून शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके कमी पडणार नाहीत. गुणवत्तापूर्ण बी-बियाणे आणि खते वेळेत मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले की, यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने योग्य नियोजन करावे. रब्बी पिकाचा जिल्हा आता खरिपाचा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू लागली आहे. ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरून ३ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे.
शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची गुणवत्ता चांगली मिळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण कक्षाने कडक कारवाई करावी. बी-बियाणे निकृष्ठ किंवा बनावट असतील, इतर कृषी निविष्ठांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर दोषींवर कृषी, महसूल विभागाने कडक कारवाई करावी. शिवाय बी-बियाणे आणि खतासोबत इतर कीटकनाशके खरेदी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक नाही. शेतकऱ्यांना कोणी खरेदीची जबरदस्ती केल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना निलंबित करा, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.
शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी तयारी करावी. पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींची बैठक घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, खतांची दरवाढ, वीज जोडणी, शेततळे, नादुरुस्त बंधारे याबाबत मांडलेल्या सूचना, उपस्थित केलेले प्रश्न शासन दरबारी मांडून मार्गी लावणार असल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.
श्री. माने यांनी सादरीकरणाद्वारे खरिपाच्या नियोजनाची माहिती दिली. यंदा ३ लाख ७५ हजार ८०२ हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये कडधान्याचे प्रमाण जास्त आहे.
- वेबिनारद्वारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन
मागील चार-पाच वर्षात केळी, द्राक्षे, डाळिंब यांचे जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे वेबिनारद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ७२७ ग्रामकृषी विकास समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये १११ शेतकरी निवडले असून व्हाट्सएपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांची कार्यशाळा घेत आहेत. किसान वाणी कार्यक्रमातूनही मार्गदर्शन सुरू आहे.
- कृषी योजनांच्या माहितीसाठी
८०१०५५०८७० या व्हाट्सएप नंबरवर शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची माहिती मिळणार आहे. शिवाय कृषी योजनांची माहिती मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोड उपलब्ध करून दिला असून याद्वारेही पिकांचे तंत्रज्ञान, माहिती मिळणार आहे.
- फेसबुक पेजद्वारेही मार्गदर्शन
यंदा ४०० शेती शाळांचे नियोजन असून यामध्ये २० महिलांसाठी असणार आहेत. आजपासून krushivibhagsolapur या फेसबुक पेजद्वारेही शेतकऱ्यांना कृषी विभाग मार्गदर्शन करणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी सांगितले.
बैठकीला ऑनलाईनद्वारे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे हे उपस्थित होते.