कोझीकोड : धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोझिकोडमध्ये उघडकीस आला आहे. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्यूटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री पावणे दहा वाजता ही घटना घडली. इलाथूरजवळ अज्ञात व्यक्तीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या सहप्रवाशांच्या अंगावरही पेट्रोल शिंपडून आरोपीने आग लावली. ही घटना अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या डी१ बोगीत रात्री १० वाजता घडली. या घटनेत तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून, नऊ जण जखमी झालेत. रेल्वेने कोझिकोड क्रॉस करताच दोन प्रवाशांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिले. यामुळे अन्य प्रवाशांनी चेन ओढून रेल्वे थांबवली व घटनेची पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना प्रवाशांनी सांगितले की, एक महिला व मुलगा रेल्वेतून बेपत्ता आहे. पोलिसांनी या दोघाचाही शोध सुरू केला आहे. दुसरीकडे, रेल्वे स्थानकाच्या रुळावर महिला, मुलगा व एका पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या मते, आग लागल्यामुळे या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ते रेल्वेतून पडले असतील. दुसरीकडे, आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आसपासच्या सीसीटीव्हीची मदत घेत आहेत.
जखमीपैकी पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तर इतर तिघांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.