ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला, शिवसेना कुटुंबाकडून आभार – उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई : राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणुक लागली आणि शिवसेनेने श्रीमती ऋतुजाताईंना उमेदवारी देण्याचा निश्चय केला.

त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला मात्र न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेल आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्व. गोपीनाथजी मुंडे, आर.आर पाटील, भाजपच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने समाजिक चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या जाण्याने कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही.

ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेबांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील. यशवंतराव चव्हाण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , विलासराव देशमुख, प्रमोद महाजन , शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल अशी मला खात्री आहे.

जय महाराष्ट्र

आपला नम्र
उध्दव बाळासाहेब ठाकरे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!