नवी दिल्ली: देशात पेट्रो-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे. केंद्र सरकारवर वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन टीका होऊ लागली आहे. मागील आठवड्याभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढतच चालले आहे. दरम्यान पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थान राज्यात पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहे. राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. नॉन प्रीमिअम पेट्रोलची रिटेल किंमत प्रतिलीटर 100 रुपये 13 पैसे इतकी झाली आहे. देशभरातील पेट्रोल दरांमधील हा उच्चाकं आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर 92 रुपये 13 पैसे इतका झाला आहे.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 25 पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 26 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच पेट्रोलचा दर प्रतिलीटर 96 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर 95 रुपये 46 पैसे, तर मंगळवारी 95 रुपये 75 पैसे इतका होता. तर डिझेलचा दर 90 च्या जवळ पोहोचला आहे. डिझेलचा दर सध्या प्रतिलीटर 86 रुपये 98 पैशांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर 86 रुपये 34 पैसे इतका होता.
दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत 25 पैशांनी वाढले आहेत. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर 89 रुपये 54 पैसे आणि डिझेलसाठी 79 रुपये 95 पैसे मोजावे लागत आहेत. फक्त 10 दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत.