तीर्थक्षेत्र विकास, खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि उजनीच्या पाण्याची अपेक्षा ; आमदार कल्याणशेट्टी यांच्या नियोजन समितीवरील वर्णीने अपेक्षा वाढल्या
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत अक्कलकोटचा विकास,खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि उजनीच्या पाण्याची अपेक्षा शिंदे – फडणवीस सरकारकडून व्यक्त होत आहे. यात जिल्हा नियोजन समितीवर आमदार कल्याणशेट्टी यांची वर्णी लागल्याने निधीच्याही अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अक्कलकोट तालुका हा राज्याच्या दृष्टीने टेलेंड आहे. तीर्थक्षेत्र दर्जा आहे पण म्हणावा तसा निधी नाही त्यामुळे पंढरपूर, आळंदी, शिर्डी तीर्थक्षेत्राच्या तुलनेत अक्कलकोट मागे पडले आहे. हा विकास साधण्यासाठी सत्ता आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी हव्यात. त्या दोन्ही गोष्टी सध्या तरी अक्कलकोटमध्ये पाहायला मिळत आहेत.
केंद्रात भाजप सरकार आहे राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आहे. त्यामुळे आता अक्कलकोटला थेट मोठ्या निधीची अपेक्षा आहे आणि अक्कलकोटचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या काळात पोलीस वसाहत, नवीन तहसील, शेकडो पाझर तलाव, पंचायत समितीची इमारत, मैंदर्गी आणि दुधनी नगरपालिकेची इमारत, नागणसूर उपबाजार समिती, अक्कलकोट – कुरनूर जलवाहिनी यासह कुरनूर धरण असे मोठे प्रकल्प पूर्णत्वास गेले. अजूनही अक्कलकोटच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे अशा स्थितीमध्ये आता उजनीचे पाणी अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी मागच्या २५ वर्षांपासून लढा सुरू आहे.
उजनीचे पाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे कारण हे पाणी आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती होणार नाही.कुरनूर धरण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे जोपर्यंत उजनी धरणाचे पाणी कुरनूर धरणात येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध होणार नाही. ही योजना पूर्ण करण्याची अपेक्षा या सरकारकडून राहिली आहे.
दुसरी गोष्ट अक्कलकोट शहरातील मुख्य रस्ते जे आहेत ते अरुंद आहेत त्यामुळे वाहतुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्ता प्रशासनाकडून वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात आहेत.त्यावर कायमस्वरूपी उपाय हवेत. नवीन तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर होत आहे. त्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळून तातडीने निधी देखील मिळणे अपेक्षित आहे. कारण यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार झाला होता परंतु निधी मिळण्यास मोठा विलंब झाला होता. आता आमदार सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत अशा स्थितीमध्ये तीर्थक्षेत्र विकास, उजनीचे पाणी हे दोन प्रश्न तरी प्रामुख्याने मार्गी लागणे अपेक्षित आहे तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खराब आहेत यासाठी मोठ्या निधीच्या तरतुदीची अपेक्षा आहे.
मध्यंतरी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला असताना काही गावाने थेट कर्नाटकात जाण्याची धमकी दिली होती. यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने हे बंड वेगळ्या मार्गाने ‘थंड’ केले होते. यानंतर हा विषय संपला होता. तडवळ, सुलेरजवळगे करजगी या भागातील रस्ते खास करून दुरुस्त झाले तर अक्कलकोट शहराशी त्यांचा ‘कनेक्ट’ चांगला होणार आहे .रस्ते खराब असल्यामुळे अक्कलकोट शहराला वेळेवर पोहोचणे मुश्कील आहे. अक्कलकोट शहरात पाणी प्रश्न गंभीर आहे या ठिकाणी आणखी एखादी नवीन योजना राबवून पहिल्यांदा जुनी वितरण व्यवस्था बदलण्याची गरज आहे. तीर्थक्षेत्र असल्याने रोज शहराला पाणीपुरवठा होणे फार महत्त्वाचे आहे यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा विभागातून विशेष निधीच्या तरतुदीची अपेक्षा आहे.
बस स्टॅन्डचा विषय तर गेली अनेक वर्ष गाजत आहे. पूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असताना केवळ याची घोषणा झाली होती. त्यानंतर हा प्रश्न रखडला. पुन्हा महाविकास आघाडी सरकारने निधीची तरतूद केली परंतु अजूनही हा प्रश्न तसाच आहे. दिवसेंदिवस बस स्टॅन्डची अवस्था दयनीय होत चालली आहे. यामुळे नागरिकांचा अक्षरशः जीव धोक्यात आला आहे. मंजूर झालेल्या निधीचा वापर लवकरात लवकर करून हा प्रश्न देखील मार्गी लावण्याची गरज आहे. सध्या इतर तालुक्याच्या तुलनेत अक्कलकोट हे राज्याच्या नेतृत्वाच्या खूप जवळ आहे. त्यामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील वर्षानुवर्षापासून रखडलेले प्रलंबित प्रश्न आता सुटण्याची जनतेला मोठी आशा आहे.
विशेष पॅकेजची मागणी
अक्कलकोट शहरा लगतचा बॅगेहळळी रोड,मैंदर्गी रोड, बासलेगाव रोड, शिवपुरी भाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे परंतु हा भाग ग्रामपंचायतमध्येही नीट नाही आणि नगरपालिकेमध्येही नीट निधी नाही. सुविधांची मोठी वाणवा आहे. हा भाग सुधारण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेजची मागणी पुढे येत आहे.