त्रिपुरारी पौर्णिमेत पोलिसांनी केले चांगले नियोजन; वाहतुकीची कोंडी रोखल्याने भाविकांनी व्यक्त केले समाधान
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१० : भाविकांच्या प्रचंड तक्रारीनंतर यंदाची त्रिपुरारी पौर्णिमा प्रथमच पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे सुरळीतपणे पार पडली. यात देवस्थान व अन्नक्षत्र मंडळांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने प्रशासनाने नियोजनाबाबत सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मंदिरापासून दूर काही अंतरावरती महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिकेटिंग लावल्याने वाहनांचा प्रवेश मंदिर परिसरात झाला नाही. ठिक -ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. हे पौर्णिमेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
पौर्णिमेच्या आधी पंधरा दिवस अक्कलकोट शहरामध्ये झालेली वाहतुकीची कोंडी हे सर्वच यंत्रणांना डोकेदुखी ठरली होती. याबाबत भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. वरिष्ठ पातळीवरही याची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी या अधिकाऱ्यांनी देवस्थान व अन्नछत्र यांच्याबरोबर नियोजनाची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रत्येकाने जबाबदारी घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे नियोजन व्यवस्थित पार पडले. वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी प्रशासनाला नियोजनासाठी सहकार्य केले.
यापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंदिरात जाऊन पाहणी करून संबंधितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्याचीही कार्यवाही झाली आहे. म्हणून त्रिपुरा पौर्णिमेच्या दरम्यान कारंजा चौक, प्रियदर्शनी मंगल कार्यालयाच्याकडून येणाऱ्या रस्त्यावर कुठेही वाहनांची गर्दी दिसली नाही आणि ज्या ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली होती. त्याच ठिकाणी वाहने लावण्यात आलेल्या भाविकांनी चालत जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन रांगेत घेतले. आता दरवेळी उत्सव काळात अशा प्रकारचे नियोजन पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन करावे, अशी मागणी भाविकांमधून जोर धरत आहे.
वाहनांची गर्दी होऊ दिली नाही
त्रिपुरारी पौर्णिमेला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाच्या प्रमुखांवर दिली होती. त्यामुळे भाविकांना त्रास झाला नाही. मुळात वाहनांची गर्दी होऊ दिली नाही – राजेंद्रसिंह गौर,उपविभागीय पोलीस अधिकारी
दरवेळी असेच नियोजन करू
दरवेळी अशा प्रकारचे नियोजन झाले तर भाविकांची गैरसोय होणार नाही.उत्सव काळात सर्वांची प्रशासनाबरोबर बैठक होणे गरजेचे आहे.दरवेळी अशा प्रकारच्या बैठका घेऊन नियोजन चांगले करू – बाळासाहेब सिरसट, तहसीलदार