पत्रकारांच्या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी ; अश्पाक बळोरगी ‘सर्वपक्षीय नेते’; पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लागणार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१७ : पत्रकार भवन उभारणीसाठी जागेबरोबरच निधी देऊन सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. श्री स्वामी समर्थ मराठी प्रेस असोसिएशन आणि डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित होते. प्रारंभी प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी स्वागत केले तर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष मारुती बावडे यांनी प्रास्ताविकामधून पत्रकार भवन उभारणीची मागणी केली. पत्रकार शिवानंद फुलारी यांनी पत्रकारिता आणि समाज या संदर्भात मनोगत व्यक्त केले.
पत्रकार भवन मागणीचा धागा पकडून माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे अक्कलकोट संस्थानमध्ये सेवेला होते. त्यामुळे अक्कलकोटमध्ये बहुउद्देशीय पत्रकार भवन असणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या लेखणीमध्ये खूप मोठी ताकद असते हे विसरून चालणार नाही. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनीही पत्रकार भवनासाठी आग्रहाचे प्रतिपादन केले. आमदार कल्याणशेट्टी यांनी पत्रकार भावना संदर्भात तहसीलदार आणि गटविकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून जागा निवडली जाईल आणि पत्रकार भवनासाठी निधी देण्याची ग्वाही दिली. यावेळी पत्रकारांचा सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर लोकाभिमुख कामाबद्दल तहसीलदार बाळासाहेब सिरसट गटविकास अधिकारी सचिन खुडे व पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी महावितरणचे अधिकारी संजीव कुमार म्हेत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी उमेश काटे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, जिल्हा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सतिश सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, रासपचे सुनील बंडगर, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष राम जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका अध्यक्ष भीमराव साठे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अमर शिरसाठ, विश्वनाथ भरमशेट्टी, राहुल काळे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी अमर पाटील, सुधीर माळशेट्टी, संजय इंगळे, जितेंद्र जाजू यांनी सहकार्य केले. यावेळी अनंत अंबूरे, सैदप्पा इंगळे, यशवंत पाटील, बसवराज बिराजदार, रविकांत धनशेट्टी, महेश गायकवाड, रामेश्वर भंडारी,राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड, अश्पाक मुल्ला, दयानंद दणुरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब निंबाळकर यांनी केले तर यशवंत पाटील यांनी आभार मानले.
पत्रकारांच्या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी
हा कार्यक्रम पत्रकार संघटनेचा असल्यामुळे कधी नव्हे इतके सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र जमले होते. या कार्यक्रमात भाषणादरम्यान एकमेकांनी एकमेकांवर कोपरखळी मारत राजकीय विषयावर जुगलबंदी केली.याची सभागृहातील नागरिक आणि पत्रकारांमध्ये बराच काळ चर्चा रंगली होती.
मी काँग्रेसचा सर्वपक्षीय कसा ?
शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी काँग्रेस नेते अश्पाक बळोरगी यांना ‘सर्वपक्षीय नेते’ असे संबोधले. यावर बळोरगी यांनी हसत हसत मी काँग्रेसचा आहे, सर्वपक्षीय कसा असा प्रश्न सर्वांना केला. यावर सूत्रसंचालन करतेवेळी बाबा निंबाळकर यांनी सकाळी म्हेत्रेंबरोबर आणि संध्याकाळी स्नेहभोजनांसाठी कल्याणशेट्टी यांच्याबरोबर अशी कोपरखळी मारत या विषयात रंगत आणली. हाच मुद्दा पकडत आमदार कल्याणशेट्टी यांनी देखील आमचे संबंध हे फार जुने आहेत, असे सांगत या विषयात आणखी रंगत आणली. या विषयावरून सभागृहात एकच हशा पिकला होता.