मुंबई, दि. २८ डिसेंबर : भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत आहेत. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे १० हजार गांधीदूत भाजपच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या जॉईन कॉंग्रेस सोशल मीडिया मिशन १० हजार, या मोहिमेचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
LIVE: प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE यांची पत्रकार परिषद #CongressMission10K https://t.co/LZo5RixquT
— RAJIV ITOLE (@rajivitole) December 28, 2021
नाना पटोले म्हणाले, राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते. मात्र, त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजप आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. यावेळी सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार या मोहिमेबाबत माहिती देताना म्हणाले की, “प्रदेश कॉंग्रेसकडून मी गांधीदूत ही सोशल मिडिया मोहीम १ वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती. या अंतर्गत राज्यभरातील सुमारे १५००० लोकांनी नोंदणी केली होती व त्यांची माहिती प्राप्त झाली होती. या १५००० जणांमधून १०००० लोकांना “जॉईन कॉंग्रेस सोशल मीडिया मिशन १००००” या मोहिमेतून कॉंग्रेसचे सोशल मिडिया पदाधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे. भाजपकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल आणि सत्य माहिती जनतेसमोर आणेल. भाजप ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपला काँग्रेसकडून उत्तर मिळेल, असे मत यावेळी मान्यवरांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे राज्य अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, संघटन सरचिटणीस देवानंद पवार व सोशल मीडियाचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.