ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये अवतरले प्रति मोदी;घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट, दि.२३ : जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि हरि दर्शनाची अनुभूती प्राप्त होते असे साक्षात्कारिक स्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री  स्वामी समर्थांचे पावन स्थान तथा येथील वटवृक्ष मंदिर होय. केवळ भाग्यवंतांनाच स्वामी दर्शनाचा लाभ मिळतो याची प्रचिती स्वामी दर्शनाचा लाभ मिळालेल्या भाग्यवान स्वामी भक्तांना येते याची आपणाला माहिती मिळाली असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी साम्य असलेले व प्रति मोदी म्हणून सुपरिचित असलेले प्रसिद्ध कवी व कलाकार विकास महांते यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी विकास महांतेंचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.

यावेळी भाविकांच्या स्वामी दर्शन अनुभूती बद्दल बोलताना महांतेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना महांते यांनी सुप्रसिद्ध कलाकार व कवी या नात्याने तात्काळ काव्यमाला रचून ‘जीवनात जेथे सर्वार्थाने अर्थ, भक्तालागी पाठीशी राही नित्य स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’ या काव्यपंक्तीत त्यांनी आपली स्वामी भक्ती व्यक्त केली, व स्वामी कृपेचा ध्यास घेवून प्रथमच अक्कलकोटला आलो असल्याचे प्रतिपादनही महांते यांनी याप्रसंगी केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अकलूज ग्रामपंचायत सरपंच किशोरसिंह माने पाटील, सदस्य क्रांतिसिंह माने पाटील, मिस्त्री साहेब, सुरेश देशपांडे, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी, संजय पाटील, देवस्थानचे सेवेकरी उपस्थित होते. विकास महांते यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ते मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती असून ते अभिनेता बनले आहेत. ते नरेंद्र मोदीजींसारखे दिसतात म्हणून पी.एम. मोदींच्या ग्रामीण विकासाच्या योजनांवर आधारित “मोदी काका का गांव या चित्रपटात त्यांनी मोदीजींची भुमिका साकारण्याची संधी लाभली आहे, जो लवकरच प्रदर्शीत होईल. हा एक अर्ध- काल्पनिक चित्रपट आहे, जो पंतप्रधान मोदींच्या ग्रामीण विकासाच्या योजनेवर आधारित आहे, ज्याला सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या आक्षेपाचा सामना करावा लागला आणि निर्मात्याला पंतप्रधान कार्यालयाकडून एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) मिळविण्यास सांगितले गेले. या चित्रपट व्यतिरिक्त हॅपी न्यू इयर चित्रपटासह अनेक मालिकात देखील त्यांनी काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!