अक्कलकोट, दि.५ : सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यात दिवसेंदिवस
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेणे हा एक महत्त्वाचा उपाय मानला जात आहे
परंतु अक्कलकोट तालुक्याला लोकसंख्येनुसार लस उपलब्ध होत नाही, त्यामुळे प्रशासनाने व सरकारने त्वरित लस उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी अक्कलकोट भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा हा लोकसंख्येच्या मानाने पुणे इतका असून पुणे जिल्ह्याला १० लाख लस मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्याला केवळ ३ लाख लस मिळाले आहेत. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या पाहता किमान ६ ते ७ लाख लस मिळणे अपेक्षीत आहे.पण मिळत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका हा कर्नाटक सिमेवर असल्याने नागरीकांची ये-जा जास्त आहे.
त्यामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये कोविडचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.आता पुन्हा कोविडची तीसरी लाट येण्याची शक्यता असल्याने १८ ते ४५ वयोगटातील नागरीकांना व ४५ वर्षे पुढील नागरीकांना कोविडच्या दुसरी लसची आवश्यकता आहे. जनता भयभीत झाली आहे.त्यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी जास्ती जास्त लस उपलब्ध करुन देण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद निहाय कोविड सेंटर चालु करण्यात यावे,असेही सांगण्यात आले आहे.त्याशिवाय सध्या उजनी धरणातून इंदापूरला पाणी नेण्याचा प्रश्न पेटला आहे.हा निर्णय चुकीचा असून
तो निर्णय मागे घ्यावा. जिल्ह्यातील अनेक योजना अपूर्ण असताना त्यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकार उदासीन
आहे मात्र उजनीतील पाण्यावर डल्ला
मारुन इंदापूर तालुक्यासाठी पाणी नेत
आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे.
यातून सोलापूर जिल्ह्यावर अन्याय झाला आहे.असे असेल तर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याचे पालकत्व न स्विकारु नये. इंदापूर तालुक्याचा आदेश तातडीने
रद्द करण्यात यावा,अन्यथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भाजपने दिला आहे.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, युवा मोर्चा अध्यक्ष रुषिकेश लोणारी, अंकुश चौगुले, शिवशंकर स्वामी, राहुल वाडे, समर्थ होळा, आतिष पवार, रमेश कापसे, माजी सरपंच
दोड्याळे आदी उपस्थित होते.