सोलापूर, दि.21- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी नव्याने गठीत केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पुतळा उभारण्यासंदर्भात चालू असलेला कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
नवनियुक्त समिती सदस्यांचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह शिवदास बिडगर, माऊली हळणवर, अमोल कारंडे, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे, बापूसाहेब मेटकरी, शरणू हांडे, श्री सोनटक्के , बापूसाहेब काळे आदी स्मारक समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाकडून सुरू असलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारकासंदर्भात माहिती दिली. पद्मश्री पुरस्कार प्राप्त शिल्पकार श्री राम सुतार यांच्याकडून अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा तयार करून घेण्यात येत असल्याचे सांगितले. पेडस्टल तसेच टॉवर उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू असल्याचे सांगितले. विद्यापीठाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी समिती सदस्यांनी प्रत्यक्ष पुतळा उभारणाऱ्या जागेची देखील पाहणी केली.