ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुढच्या ४८ तासात राज्याच्या ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता

पुणे :  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  खरंतर, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली. यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.

सद्य:स्थितीत सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे. राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान खाली आलेला पारा आता १७ ते २० अंशांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, पुणे शहर परिसरात गेल्या पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे हवामान विभागाने  पुढील दोन दिवस शहर परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे.  पुणेकरांनी आणि खासकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या पट्टय़ाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाडय़ासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!