अक्कलकोट : कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला असून धरण सध्या ५२ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने गुरुवारी सायंकाळी दिली. मागच्या आठ दिवसा खाली सतत चार ते पाच दिवस पाऊस पडला होता. त्यामुळे धरण दणक्यात ४० टक्के भरले होते. त्यानंतर मात्र अतिशय मंद गतीने पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने पाणी पातळी वाढताना दिसत नाही.
सुरुवातीला हरणा नदीच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता. त्यावेळी २० टक्के पाणी वाढले होते. त्यानंतर तुळजापूर, नळदुर्ग भागात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे बोरी नदी द्वारे पाणी मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र ३० टक्के पाणी या नदीद्वारे आले होते.
दोनच दिवसांपूर्वी धरणाने ५० टक्केची पातळी ओलांडली होती. आता मात्र बुधवार सकाळपासून पाण्याचा प्रवाह खूपच मंदावला आहे. त्यामुळे पाणीसाठा स्थिर असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने पत्रकारांशी बोलताना दिली.
पावसाळा अद्याप बाकी आहे. त्यामुळे धरण या वर्षी शंभर टक्के भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तूर्तास झालेल्या पाणीसाठयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे अक्कलकोट शहरवासीयांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.