सोलापूर : जिल्हा परिषदेचे ग्लोबल टीचर रणजीत डिसले यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. माढ्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी हवी होती. दीड महिना शिक्षण विभागाने अर्ज प्रलंबित ठेवला, मानिसक त्रास दिला व पैशाची मागणी केली असा त्यांनी केलेला आरोप व मागील तक्रारीवरून चौकशी समितीने सादर केलेला अहवाल या दोन्ही कारणांनी राज्यभर वादळ उठले होते. अखेर माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेत करीत जिल्हा परिषद प्रशासनाला तात्काळ परवानगी द्यायला लावली.
दरम्यान मानसिक छळ कोणी केला व पैसे कोणी मागितले, अशी सीईओ दिलीप स्वामी यांनी त्यांना नोटीस बजावली. यामुळे डिसले गुरुजींच्या अडचणींत वाढ झाली व त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्था व विज्ञान केंद्रात हजर राहून प्रशिक्षण दिले का, हा वादाचा मुद्दा पुढे आला. डिसले गुरुजींनी आरोपांबाबत प्रशासनाची माफी मागितल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. ‘आता यापुढे मी प्रसारमाध्यमांपुढे जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर करीत प्रकरण थांबविण्याची त्यांनी विनंती केली होती.
दरम्यान, शिक्षक रणजीत डीसले हे डायटला हजर होते का नाही व त्यांच्या एकूणच अनिमित्ता बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाच अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल आला असून डीसले हे मोठ्या प्रमाणात दोषी आढळले असल्याचे समजते. हा चौकशी अहवाल बाहेर येण्या अगोदरच डीसले यांनी राजीनामा दिला आहे.