खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दसऱ्यानंतर रास्ता रोको आंदोलन करणार; माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची माहिती
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.५ : दुधनीजवळील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संबधित विभागाला अनेकदा पाठपुरावा केला आहे. तसेच ठेकेदारास कल्पना देण्यासंदर्भात कार्यवाही केली आहे. आता जास्तीच्या पावसाने रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. येत्या चार दिवसात रस्त्याची दुरूस्ती हाती घेतली नाही तर दसऱ्यानंतर हजारोंच्या संख्येने रेल रोको व रास्ता रोको करणार असल्याचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अक्कलकोट आणि गाणगापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या महामार्गाला दुधनीजवळ तर संगोळगी-बिंजगेर गावाजवळील चढणपर्यंत रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहन चालकाना खड्ड्यांचा अंदाज समजत नसल्याने जमिनीला आदळून अनेक अपघात होत आहेत. विशेष म्हणजे दुधनी रेल्वे गेट होणे गरजेचे बनले आहे. तासनतास वाहने याठिकाणी थांबल्याने वेळ व इंधनाचा अवाजवी खर्च होत आहे. दुधनी येथे मार्केट कमिटी असल्याने दररोज याठिकाणी तालुक्यासह शेजारील जिल्ह्यातुन शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. या खचलेल्या रस्त्यामुळे दळणवळणावर खुप मोठा परिणाम होत आहे. तसेच अक्कलकोटहून गाणगापूर येथील दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्ताना मोठी कसरत करावी लागत आहे.
याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्ये दुधनीच्या रस्त्याची भिती निर्माण झाली आहे. यावर्षी दुधनी शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरील मुरूम कडेला जावून रस्ते निसरडे बनले आहे. यामुळे संबधित विभागाने या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून स्वामी भक्तांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
दुधनीला शेतीमाल न्यायचा असेल तर भाडे जास्तीचे..
दुधनीजवळील रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावरची वाहतुक म्हणजे जणू सर्कसचा खेळच बनला आहे.ही भीषण परिस्थिती शेतकऱ्यांना सांगत शेतीमाल नेण्यासाठी वाहनधारक दुधनीच्या वाहतुकीसाठी जास्तीचे पैसे घेत आहेत. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.