नवी दिल्ली । लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्याने आरबीआयने या बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध लादले आहेत. लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध लागू करून २४ तास उलटत नाहीत तोच अजून एका बँकेवर निर्बंध घातले आहे. रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बँकेला काही सूचना करण्यात आल्या असून, बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध हे १७ नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यापासून पुढचे ६ महिने लागू राहणार आहेत. दरम्यान, सहकारी बँकेचे ग्राहक यापुढे खात्यांमधून पैसे काढू शकणार नाहीत.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार आता मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कुठलेही कर्ज किंवा उधारी देता येणार नाही. तसेच जुन्या कर्जांचे पुनर्गठण किंवा कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही. तसेच बँकेवर नव्याने ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच बँकेला कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्याचा करार करता येणार नाही. मात्र रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लागू करण्यामागचे कारण सांगितलेले नाही.
केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील अडचणीत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेला मोरेटोरियम मध्ये ठेवून विविध निर्बंध घातले आहेत. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, 16 डिसेंबरपर्यंत बँक मोरेटोरियम अंतर्गत ठेवण्यात आली आहे. केंद्राने बँकेच्या ग्राहकांची पैसे काढण्याची मर्यादाही निश्चित केली आहे. आता एका महिन्यासाठी बँक ग्राहक दररोज जास्तीत जास्त 25,000 रुपये काढू शकतील.
अर्थ मंत्रालयाने नमूद केले की, लक्ष्मीविलास बँक बीआर कायद्याच्या कलम -45अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकने दिलेल्या अर्जाच्या आधारे मोरेटोरियम अंतर्गत ठेवण्यात आले आहे. मोरेटोरियम अस्तित्त्वात येईपर्यंत बँक ठेवीदारास 25 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ शकत नाही. यासाठी अधिकाधिक पेमेंटसाठी बँकेला रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागेल. तसेच, केंद्रीय बँकेच्या लेखी आदेशानुसार लक्ष्मीविलास बँक विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ शकते.
ही बँक 94 वर्ष जुनी आहे
एलव्हीएस बँक ची स्थापना 1926 मध्ये झाली. बँक देशभरातील 16 राज्यात 566 शाखा आणि 918 एटीएम कार्यरत आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना आश्वासन दिले होते की, सध्याचे संकट त्यांच्या ठेवींवर परिणाम करणार नाही. बँकेने असे म्हटले होते की ठेवीदार, बॉन्डधारक, खातेदार आणि लेनदारांची मालमत्ता तरलता संरक्षण गुणोत्तर (एलसीआर) मध्ये 262 टक्के आहे.