राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा..! विनयभंगाच्या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
ठाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळला आहे. ठाण्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणात आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला.
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना माॅल प्रकरणी अटक आणि जामीन मिळाला होता. त्यानंतर कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर गर्दी सारून पुढे जाताना महिलेला त्यांनी बाजूला केले होते. या महिलनेने आपला विनयभंग झाला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला. त्यानंतर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती.
ठाणे सत्र न्यायालयात आज या प्रकरणावर सुनावणी झाली. जितेंद्र आव्हाड यांच्या वतीनं वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. संबंधित महिलेला गर्दीतून बाजूला करण्यामागे आव्हाड यांचा विनयभंग करण्याचा हेतू नव्हता. ही महिला आव्हाड यांच्या परिचयाची असून यापूर्वी आव्हाड यांनी तक्रारदार महिलेला बहीण असंही संबोधलं आहे, असं वकिलांनी न्यायालयात सांगितलं.