अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. हे राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने योग्य नाही, आपल्या पक्षातील एका ‘महान’ नेत्याच्या या वागण्यामुळे आमच्यासारख्या नवीन पिढीने काय बोध घ्यावा, त्यामुळे ‘यांना’ आवरा अशा प्रकारची तक्रार आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याकडे केली आहे.
विरोधकांनाही मान देण्याची स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे. आजवर सर्व पक्षातील नेत्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करून राज्यातील भाजपच्या एका ‘महान’ नेत्यांनी अलीकडच्या काळात अतिशय खालच्या स्तरापर्यंत मजल मारली आहे. हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही.
यामुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल मात्र ती आम्ही होऊ देणार नाही परंतु आपल्या सारख्या वरिष्ठ नेत्यांनीही याबाबतीत लक्ष घालून योग्य ती पावले उचलावीत, हीच आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने शरद पवारांवरती टीका करत असल्यामुळे रोहित पवार संतापले असून आत थेट मोदींकडे तक्रार केल्यामुळे पुढे काय होते, ते पाहावे लागेल.