परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य! महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल
मुंबई : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठीच्या निर्बंधामध्ये बदल करण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीतील तफावत दूर केल्याचे सांगितले आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर अनिवार्य करण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
तसेच शिक्षणमंत्र्यांसोबत शाळांच्या संदर्भात चर्चा झाली. यावर आमची चर्चा झाली होती, हा नवा विषाणू त्यावेळी नव्हता. पण आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा आहे. शिक्षणमंत्री याबाबत आता मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यानंतर त्यावर निर्णय होईल, असे अजित पवारांनी सांगितले. शाळांबाबत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी केंद्राशी चर्चा करु, असेही ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारची आणि आपल्या नियमावत काल थोडीशी तफावत होती, पण रात्री उशीरा एकसारखे नियम असावेत यावर चर्चा झाली. परदेशातून भारतातील विमानतळावर प्रवासी आले, तर एकसारखा नियम असावा असा प्रयत्न आपण केला आहे. देश म्हणून एक नियम असायला हवेत. इतर राज्यातून येणाऱ्यांना 48 तासाचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो. जेव्हा आपण इतर राज्यात जातो, तेव्हा आरटीपीसीआर रिपोर्ट लागतो, तर आपल्या राज्यात येण्यासाठी लागेल, असे पवार म्हणाले.