ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘संगीत संत तुकाराम’ नाट्यप्रयोगाने वेधले सोलापूरकरांचे लक्ष;जय हिंद शुगरचा उपक्रम

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.१९ : कसदार अभिनय आणि दमदार गाण्याचा देखणा नजराणा याचा सुरेख संगम असलेल्या ‘संगीत संत तुकाराम’ या नाट्यप्रयोगाने सोलापूरकर नाट्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या नाट्यप्रयोगातून संत तुकाराम महाराजांचे पांडुरंगा विषयीचे प्रेम आणि त्यांचे स्वतः विषयीचे चरित्र उलगडले.सोलापुर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे जय हिंद शुगर, आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर ) तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत दोन दिवस या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा गुरुवारी पहिला प्रयोग पार पडला. मनोहर नरे संस्थापित ओम नाट्यगंधा निर्मित या तुफान विनोदी नाटकाला सोलापूरसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागातील शेतकऱ्यांची मोठी संख्येने उपस्थिती होती.प्रारंभी या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन, प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाला ह.भ.प राजेंद्र मोरे महाराज देहूकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक बब्रुवान माने देशमुख, शालिवाहन माने देशमुख, बाळासाहेब माने देशमुख, माऊली पवार, विनोद भोसले, हरिदास शिंदे, विजय पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता मोकाशी यांनी केले. हा कार्यक्रम चेअरमन गणेश माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्याचे सांगून हा नाट्य सोलापूरात आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली.

या नाट्यप्रयोगात साक्षात तुकोबांची भूमिका प्रति बालगंधर्व विक्रांत आजगावकर यांनी हुबेहूब केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची तुकाराम महाराजांबरोबर झालेली भेट या नाटकाचा मुख्य भाग आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना विशेष नजरांना पाठविला होता तो मुंबाजी बुवा यांनी स्वतःकडे ठेवून घेतला त्यानंतर पुन्हा एकदा तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांकरवी नजरांना पाठवला होता तो नजराणा संत तुकाराम महाराजांनी नम्रपणे परत करताना त्यांच्या पत्नी जिजाबाईंची झालेली विचित्र मनस्थिती हा प्रसंग सर्वांचे लक्ष वेधून घेतला.

यात चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी तूंभाची भूमिका स्वीकारून समाजातील अनिष्ट,रूढी परंपरा,अंधश्रद्धा अशा गोष्टींवर प्रहार केला आहे. बुवाबाजीवर अजिबात विश्वास ठेवू नये अशा प्रकारचा खुले आम संदेश या नाट्यातून त्यांनी समाज मनाला दिला आहे. त्यांनी उत्तम भूमिका करत आपल्या विनोदी वक्तृत्व शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेत उपस्थितांचे मन खिळवून ठेवले.

रंभा, तुंभा, मुंबाजी बुवा आणि तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांच्या भूमिका कलाकाराने उत्तम प्रकारे सादर केल्या आहेत. दि.२० जानेवारी म्हणजे आज देखील दुपारी १२.३० वाजता एक आणि ४.३० वाजता एक असे दोन प्रयोग सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहेत,असे कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख यांनी सांगितले.यावेळी नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रति बालगंधर्व आजगावकर मुख्य भूमिकेत

या नाट्यप्रयोगातून भक्ती आणि शक्ती याचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे.विक्रांत आजगावकर हे तुकोबांच्या भूमिकेत आहेत त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्यांना महाराष्ट्रात प्रति बालगंधर्व असेही संबोधले जाते. त्यांच्या सुरेल आवाजाने या नाट्यप्रयोगाला मोठी उंची प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!