संघर्ष समितीच्या आंदोलनात सोबत असलेल्या कामगार व वारसांना घरासाठी मोफत जागा देणार : वाढदिनी कुमार करजगी यांची घोषणा
सोलापूर – जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समितीच्या माध्यमातून सुमारे पंचवीस वर्षे आंदोलनात सहभागी झालेल्या कामगार व त्यांच्या वारसांना घरे बांधण्यासाठी मोफत जागा देण्यात येणार असल्याची घोषणा कामगार नेते कुमार करजगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
कुमार करजगी म्हणाले,सोलापूर शहराची एकेकाळी भारतामध्ये मुंबई प्रांतातल्या मोठ्या शहरांमध्ये गिरणगाव म्हणून ओळख होती. मात्र इथल्या राज्यकर्त्याच्या स्वार्थीपणामुळे सोलापूरच्या मिल बंद पडल्या. सर्वात मोठी २२ हजार कामगार काम करत असलेली जुनी गिरणी बंद पडली. मिल बंद पडल्यानंतर या कामगारांचा मिलकडून येणारा पैसा त्यांना मिळाला नव्हता. मात्र १९६३ ते १९८८ या पंचवीस वर्षांमध्ये संघर्ष करून कामगारांना पैसे मिळवून दिले. अशक्य ते शक्य काम करून दाखवले. हायकोर्टमध्ये २५ वर्षानंतर चीफ जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी यांना याची पूर्ण खात्री पटल्यानंतर ३५ वर्षानंतर या सोलापूरच्या गिरणी कामगारांना पैसा मिळाला.
आतापर्यंत आपल्याकडील जागा सर्वांना देऊन टाकल्या.आता जुनी मिल बेकार कामगार संघर्ष समितीच्या माध्यमातून पंचवीस वर्षे आंदोलनात सहभागी झालेल्या कामगार आणि त्यांच्या वारसांना मोफत जागा देण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगत जागा मोफत देऊन त्यांनी त्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधण्याचे नियोजन केले आहे, असे कुमार करजगी यांनी सांगितले.