मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात आज महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना बीएमसी शिक्षण विभागाने केली आहे.
मार्च २०२० मध्ये राज्यातील शाळा बंद केल्यानंतर थेट १५ डिसेंबर २०२१ रोजी पहिलीपासूनच्या शाळा सुरू झाल्या. परंतु आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता पाहता खबरदारी म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.