अकलूज, बार्शी, पंढरपूर व करमाळा येथे होणार दिव्यांगांसाठी तपासणी शिबीर; शिबीराचा लाभ घेण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले यांचे आवाहन
सोलापूर,दि.22 : राज्य शासनाकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने अकलूज, पंढरपूर, करमाळा व बार्शी परिसरातील ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत शिबीर आयोजित केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.
बार्शी ग्रामीण रुग्णालयात 22, 24, 28 आणि 29 सप्टेंबर, करमाळा येथे 23, 23, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर, पंढरपूर येथे 22, 27, 29 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर, आणि अकलूज उपजिल्हा रूग्णालयात 23, 24, 28 आणि 30 सप्टेंबर 2022 रोजी ज्या दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
दिव्यांगांनी सोबत येताना ऑनलाईन नोंदणी केलेली पावती, आधार कार्ड, रेशन कार्ड, पूर्वी उपचार घेतलेली सर्व कागदपत्रे घेऊन यावीत. दिलेल्या चार ठिकाणी फक्त अस्थिव्यंग दिव्यांगांची कागदपत्रे पडताळणी व तपासणी केली जाणार आहे. हे शिबीर अकलूज येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे, बार्शी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कदम, पंढरपूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने, करमाळा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे यांच्या देखरेखीखाली पार पडत आहे. शिबीरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील मिसाळ, अकलूज आणि डॉ. भोसले, करमाळा हे काम पाहणार आहेत. जास्तीत जास्त दिव्यांगांनी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. ढेले यांनी केले आहे.