नवी दिल्ली : वरिष्ठ पत्रकार आणि हिंदी न्युज चॅनेल आज तकचे वरिष्ठ अॅंकर रोहित सरदाना यांचे आज (३० एप्रिल) निधन झाले आहे. रोहित सरदाना यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते अवघे ४२ वर्षांचे होते. सरदाना यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीमधून स्पष्ट झाले होते.रोहित सरदाना हे अलीकडेच कोविड-१९मधून बरेही झाले होते आणि कामावर परतले होते.
रोहित सरदाना हे २०१७ मध्ये आजतकमध्ये रुजू झाले होते. त्याआधी ते झी न्युजमध्ये कार्यरत होते. आजतक या हिंदी न्युज चॅनेलवर ते दंगल या एका डिबेट शोचे अॅंकर होते. सरदाना हे टीव्हीवरील किंवा न्युज चॅनेलवरील प्रचलित चेहरा होते. रोहित सरदाना यांना २०१८ मध्ये गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रोहित सरदाना यांच्या निधनाच्या बातमीने पत्रकार जगताला धक्का बसला आहे. रोहित सरदाना यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रोहित सरदाना यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत, सचिन पायलट, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह, मनोहरलाल खट्टर, अर्जुन मुंडा यांच्यासह इतर नेत्यांनी ट्विट करून शोक व्यक्त केली आहे.