वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा भागात रात्री झायलो कार पुलावरून थेट खाली कोसळुन भीषण अपघात, मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा भागात रात्री दिडच्या सुमारास भीषण अपघात झाला. देवळी येथून वर्धेकडे येत असलेली एक झायलो कार पुलावरून थेट खाली कोसळली. या उपघातात कारमधील सातही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. हे सातही विद्यार्थी सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील होते. यात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे आमदार विजय रहांगडाळे यांचा मुलगा आविष्कार याचाही समावेश आहे.
चालकाचे चारचाकीवरून नियंत्रण सुटल्याने सेलसुराजवळील नदीच्या पुलावरून चारचाकी खाली कोसळली आहे. सुमारे ४० फुटांवरून ही चारचाकी खाली पडल्यामुळे भीषण अपघात झाला. रात्री ११.३० वाजता हा अपघात झाला असून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे वय २५-३५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
सात विद्यार्थ्यांपैकी एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व यवतमाळला गेल्याचे समजते. सातपैकी सहा विद्यार्थ्यी महाविद्यालयातील वसतीगृहात राहत होते. तर एक विद्यार्थी बाहेर रहायचा. वसतीगृह प्रशासनाची संमती घेऊन सर्वजण बाहेर गेले. मात्र येण्यास उशीर झाल्याने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला. शिवाय त्यांच्या आई-वडिलांनाही माहिती देण्यात आली, अशी माहिती दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली.