मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम हे आज पत्रकार परिषद घेत परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाघात चढवला आहे. यामुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत कलह आता समोर आला आहे.
रामदास कदम हे आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन अनिल परब यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल परब यांनी माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केले. ते राष्ट्रवादीचे संजय कदम यांना मातोश्री वरती घेऊन गेले, पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही. योगेशने दोन वर्ष फोन केले, मात्र एकही कॉल त्यांनी उचलला नसल्याचे ते म्हणाले.
‘मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, शिवसेना वाचवायची असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, अन्यथा परब यांच्याविरोधात कोर्टात जाईन,’ असा इशाराही कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला. रत्नागिरी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीत रामदास कदम यांच्या समर्थकांना डावलल्यानंतर शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम हे आज आक्रमक होत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
रामदास कदम म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता, म्हणून तो पाडला गेला. माझ्या काही कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होते, हे मला माहित होते. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगतो किरीट सोमय्या यांच्याशी मी कधीच बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केले नाही.
तसेच रामदास कदम म्हणाले की, माझ्या संदर्भात तीन चार महिन्यापासून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु आहे. सर्वांना माझी भूमिका माहीत व्हावी म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. अनिल परबांनी मुंबईतून निवडून येऊन दाखवावे. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादीच्या संजय कदमांना मातोश्रीवर घेऊन आले. पण त्यांचे उद्धवजींनी ऐकले नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यावर सुडाच्या भावनेने काम केले, असे ते म्हणाले.
रामदास कदम यांच्या आरोपांवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.