रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या अधिवेशनामुळे शिवसेना प्रवक्ते तसेच आमदार भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, तिन्ही पक्षांना वाटतंय की भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करू शकतील. असे तिन्ही पक्षांचे मत आहे. तशा प्रकारची अनऑफिशियल चर्चा देखील झाली. पण मी ठामपणे सांगतो की, शिवसेनेने आपल्या कोट्यातील वनमंत्रीपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मताशी मी ठाम असल्याचे जाधव म्हणाले.
तसेच शिवसेनेकडील वनखाते तसेच राहून सर्वांसंमतीने जर विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर शिवसेनेने घ्यावे, अन्यथा शिवसेनेने आपले मंत्रीपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये. कारण एकतर शिवसेनेला महत्वाची खाती नाहीत तसेच मंत्रीपदेही कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेने स्वतःचे मंत्रीपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.