ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवदारे प्रतिष्ठानचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर;डॉ. राजीव प्रधान, डी. राम रेड्डी, किरण डोके, अभय दिवाणजी मानकरी

 

सोलापूर : येथील वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्यावतीने सहकार महर्षी, स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा डॉ. राजीव प्रधान (वैद्यकीय), उद्योजक डी. राम रेड्डी (सामाजिक), किरण डोके (कृषी), अभय दिवाणजी (पत्रकारिता) यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
सोलापुरातील किर्लोस्कर सभागृहात गुरुवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित समारंभात सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. रोख रक्कम 21 हजार रुपये व स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात कलावंत अभिराम भडकमकर यांचे ‘महाराष्ट्राचे बदलते वातावरण आणि आपण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पत्रकार परिषदेस सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉ. चनगोंडा हवीनाळे, प्रमोद बिराजदार, सुभाष मुनाळे, बाळसाहेब मुस्तारे, सूर्यकांत इसापुरे उपस्थित होते.
शिवदारे अण्णांचा जन्म 17 ऑगस्ट 1926 व मृत्यू 8 ऑगस्ट 2008 रोजी झाला. अण्णांनी आपल्या जीवनातील 65 वर्षे सार्वजनिक चळचळीत घालविली. सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, महाराष्ट्राच्या विधानसभेत सलग 15 वर्षे आमदार व प्रतोद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सलगपणे 45 वर्षे संचालक व दोन वर्षे चेअरमन, स्वामी समर्थ सूत गिरणी वळसंग, सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती, सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक व जिल्हा सहकारी ग्राहक भांडार, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ इत्यादी सर्व मोठ्या संस्था कै. अण्णांनी स्थापन करुन आपली आदर्श कार्यपद्धती नावारुपास आणली. सामाजिक व राजकीय क्षेत्रात आदर्शवत कार्य केले. या उपक्रमातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी व भावी पिढीसमोर एक आदर्श उभा रहावा याहेतूने श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय, पत्रकारिता व कृषी क्षेत्रात प्रदीर्घ काळ निःस्वार्थ भावनेने सेवा करुन ज्यांनी योगदान दिले त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा गौरव होतो. गरीब व हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. विविध क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन द्यावे, अशा याहेतूने प्रतिष्ठानची स्थापना 1999 साली झाली. रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, सामुदायिक विवाह, विविध संस्थना बांधकाम व शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य देऊन प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!