मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या नियुक्तिवरून निशाणा साधत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर खोचक टीका केली आहे.
संजय राऊत आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही राजभवनात पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिली.
ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का? राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची नावे आहेत. त्यावर सहा-सात महिने निर्णय होत नाही. ही गोष्ट महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या लौकिकाला साजेशी नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचे भान ठेवावे, असेही संजय राऊत म्हणाले.