ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धक्का, शिवाजी पार्कची लढाई उद्धव ठाकरे गटाने जिंकली

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं शिवसेनेला दिली आहे. मैदानावर मेळाव्याची परवानगी नाकारण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवुन आनंद साजरा करत आहेत.

शिवाजी पार्क प्रकरणात शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली. दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या करिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

शिवसेनेनं मेळाव्यासाठी दिलेल्या अर्जानंतर शिंदे गटानंही शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्याची परवानगी मागितली. दोन्ही गटाकडून अर्ज आल्यानंतर मुंबई महापालिकेनं कायदा सुव्यवस्थेचं कारण देत दोघांनाही परवानगी नाकारली. त्यानंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयानं आज दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले. तसंच, मैदानाला परवानगी नाकारणाऱ्या मुंबई महापालिकेचंही म्हणणं ऐकून घेतलं. कायदा-सुव्यवस्थेचं महापालिकेनं दिलेलं कारण वस्तुस्थितीला धरून नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!