अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ कारखान्यावर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची सत्ता अबाधित, बचाव पॅनलला पराभवाचा धक्का
अक्कलकोट,दि.१७ : (प्रतिनिधी) संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले असून तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वामी समर्थ शेतकरी बचाव पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा, राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर, कोळीबेटचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश दुपारगुडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संजीवकुमार पाटील यांना 42 पैकी 41 मतांनी विजयी होवून सहकारी संस्थेमध्ये सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.निकाल बाहेर येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करुन गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष साजरा केला. दरम्यान रविवारी अक्कलकोट तालुक्यातील 45 मतदान केंद्रावर 29.17 टक्के मतदान झालेले होते. या अगोदर स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे 13 उमेदवार बिनविरोध निवड झाले होते.सिद्रामप्पा पाटील, बसलिंगप्पा खेडगी, विश्वनाथ भरमशेट्टी, अप्पासाहेब पाटील, दिलीप पाटील, भिमाशंकर धोत्री, उत्तम वाघमोडे, महेश पाटील, दिलीप शावरी, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, संजीव अंबाजीप्पा पाटील, श्रीमंत कुंटोजी आदींची बिनविरोध निवड झालेली आहे.
सोमवारी, सकाळी श्री कमलाराजे चौकातील प्रियदर्शिनी मंगल कार्यालयातील मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभी सहकारी संस्था मतदारसंघाचा निकाल लागला. यामध्ये संजीवकुमार पाटील हे 41 मतानी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी संजय पांढरे यांना स्वत:चे मत पडले आहे. याबरोबर उर्वरित पाच गटातील उमेदवारांचा देखील पराभव झाला आहे.महिला मतदारसंघातून गिरीजा भिमाशंकर विजापुरे 5 हजार 100 मते (विजयी), महानंदा चंद्रशेखर निंबाळ 5 हजार 175 (विजयी) तर डॉ.सुवर्णा मलगोंडा 500 (पराभव), रुक्मिणीबाई भिमाशंकर मदने 385 (पराभव), अनु.जाती, जमाती : शिवप्पा मारुती बसरगी 5 हजार 306 (विजयी), प्रकाश मसा दुपारगुडे 374 (पराभव), श्रीमंत शिवलिंगप्पा देसाई 134 (पराभव), इतर मागास वर्ग : मल्लिकार्जुन महादेव बिराजदार 5 हजार 340 (विजयी), प्रशांत विश्वनाथ गुरव 373 (पराभव), जाफर अप्पाभाई जमादार 104 (पराभव), भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास : ब्रह्मनाथ भुताळी घोडके 5 हजार 329 (विजयी), भिमाशंकर बिरप्पा निंबाळ 97 (पराभव), सुनिल शिवाजी बंडगर 391 (पराभव) स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या 25 वर्षापासून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पाटलांना साथ
लाभली आहे.
एकाच घरातील
तीन संचालक
सिद्रामप्पा पाटील हे सुलेरजवळगे मतदारसंघातून व त्यांचे पुत्र दिलीप पाटील हे देखील याच गटातून अविरोध झाले तर सहकारी संस्था मतदारसंघातून संजीवकुमार पाटील हे विजयी झाले आहेत.संचालक पदाची हॅट्रीक करणारे सिद्रामप्पा पाटील हे जिल्ह्यात एकमेव ठरले आहेत.