ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक स्वामींचरणी लीन;स्वामींच्या नामघोषाने आसमंत दुमदुमला

 

अक्कलकोट, दि.१८ : अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जयचा जयघोष करित अक्कलकोट येथील मूळ स्थान असलेल्या वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी हजारो स्वामीभक्त स्वामी चरणी लीन झाले.तीव्र उन्हाच्या झळा असतानाही राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यासाठी मंदिर समिती पोलीस प्रशासन व अन्नछत्र मंडळांनी भाविकांची काळजी घेत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा म्हणजे अक्कलकोटकरांचे अंतकरण अक्षरशः भरून येते.त्याची प्रचिती सर्वत्र दिसून आली.या पार्श्वभूमीवर दिवसभर स्वामी नामाच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमला. पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी दिसून आली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी वटवृक्ष मंदिर समितीच्यावतीने मंदीर परिसरात बॅरेकेटींगची सोय करण्यात आली होती. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता राजे फत्तेसिंह चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला एकेरी लाईनचे कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती.प्रारंभी
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोळप्पा महाराजांचे वंशज पुरोहित मंदार पुजारींच्या हस्ते पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती संपन्न झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत पार पडला. देवस्थान व राजघराण्याच्यावतीने महेश इंगळे व गणेश दिवाणजी यांच्या उपस्थितीत पारंपरिक लघुरुद्र अभिषेक पहाटे ४ ते ५ या वेळेत पुरोहित
मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले. गेल्या ७ दिवसांपासून सुरु असलेला अखंड नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी
७ वाजता देवस्थानचे चेअरमन इंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली. सकाळी ११ वाजता देवस्थानची नैवेद्य आरती दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्यावतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते व इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे,शांभवी कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, प्रथमेश म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, मुंबईचे उद्योगपती स्वानंद खेर, जालनाचे प्रसिद्ध व्यापारी श्वेतांबर महाडिक, इंदौरचे व्यापारी जगपाल सिसोदिया आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेऊन श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. याप्रसंगी दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात
व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसाद सेवेचा लाभ घेतला. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता मंदिर समितीच्या सर्व कर्मचारी व सेवकऱ्यांनी प्रयत्न केले.यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, अँड.प्रदीप झपके, विजय दास, गणेश दिवाणजी,शिवशरण अचलेर, प्रशांत गुरव, गिरीश ग्रामोपाध्ये, श्रीनिवास इंगळे, प्रथमेश इंगळे,मंगेश फुटाणे, चंद्रकांत डांगे, नंदू जगदाळे,श्रीशैल गवंडी,प्रदीप हिंडोळे,सुभाष पेठकर, स्वामीनाथ फुलारी आदींसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

धर्मसंकीर्तन
सोहळ्याची समाप्ती

पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याचा समाप्ती सोहळा पार पडला.या भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४२ भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!