ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वटवृक्ष मंदीरातील स्वामी पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रद्द ; कोरोना लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी आले संकट

 

अक्कलकोट,दि.८ : श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने साजरा करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४३ वा पुण्यतिथी उत्सव यंदा रविवार दि.९ मे रोजी आहे.कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन
शासन आदेशाचे पालन करीत लॉकडाऊनमुळे मंदिर बंद केले असल्याने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात मंदिर समितीच्यावतीने साजरे होणारे प्रभात फेरी, धर्मसंकीर्तन, पारायण सोहळा, सनई वादन, वीणा सप्ताह, भजनसेवा, प्रसाद वाटप, पालखी मिरवणूक, गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम सलग दुसऱ्या वर्षीही रद्द झाले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.स्वामी पुण्यतिथी दिनी पहाटे ५ वाजता पुरोहितांच्या हस्ते काकड आरती होईल. देवस्थानच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींना पारंपारिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता करण्यात येईल.सकाळी ११ वाजता अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल.याप्रसंगी कोणत्याही भाविकांचा यावेळी सहभाग असणार नाही. स्वामी पुण्यतिथी निमित्त सालाबादप्रमाणे वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याकरिता प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत स्वामी भक्तांनी आपल्या घरीच
राहून पारायण, नामजप, नामस्मरण करून कोरोना मुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. संपूर्ण सृष्टीवरील मानवी जीवनावर बळावलेल्या या कोरोना नामक संकटातून श्री स्वामी समर्थ आपणा सर्वाना नक्कीच तारून नेतील. त्यामुळे कोणीही स्वामींच्या दर्शनाकरिता मंदिराकडे न येता सर्व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच यंदा स्वामींचा पुण्यतिथी उत्सव साजरा करावा,असेही आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!