कन्हेरगांव : सीना माढा सिंचन योजनेच्या कुर्डू व टेंभूर्णी विभागातील भूसंपादनाचे 16 कोटी 37 लाख रुपये शासनामार्फत उपलब्ध झाले असून कुर्डू, तांबवे-निमगाव (टेंभुर्णी विभाग)परिसरातील शेतकऱ्यांनी पा.बा.च्या भिमानगर येथील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या संपादित क्षेत्राचे पैसे मिळऊन घ्यावेत असे आमदार बबनदादा शिंदे यांनी माहितीद्वारे कळवले आहे.
सविस्तर वृत्तांत असा की, सीना- माढा सिंचन योजनेच्या कालव्यासाठी नियोजित आराखड्याप्रमाणे शेतकऱ्यांची पूर्वसंमती पत्रके घेऊन कालवा , वितरीका आदी कामे कामे पूर्ण केली आहेत. या भू-संपादित जमिनीचा योग्य तो मोबदला संमंधीत शेतकऱ्यांना मिळावा या हेतूने आमदार बबनदादा शिंदे यांनी सातत्याने महसूल विभाग, मोजणी विभाग व जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केलेला आहे. यानुसार या योजनेच्या कुर्डू परिसरातील डाव्या कालव्याच्या किलोमीटर क्रमांक 8 ते किलोमीटर क्रमांक 11.325 यातील संपादित क्षेत्रासाठी 7 कोटी 29 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत .याच डाव्या कालव्याच्या पुच्छ वीतरीके कडील( टेल एण्ड) विभागासाठी 1 कोटी 75 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत, तसेच टेंभुर्णी विभागातील निमगाव वितरीकेवरील तांबवे – खडके वस्ती उपवितरीका विभागासाठी 7 कोटी 33 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. अशाप्रकारे एकूण 16 कोटी 37 लाख रुपये संमंधीत भू संपादित शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
सीना- माढा सिंचन योजनेच्या उर्वरित राहिलेल्या भूसंपादन क्षेत्राचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून शासनाकडे सतत पाठपुरावा चालू असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. कोरोना महामारी च्या काळात शासनाकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे सीना- माढा च्या भूसंपादनाचे पैसे मिळण्यास थोडा उशीर झाला असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले. शेतकऱ्यांनी आता पाटबंधारे कार्यालयाकडे अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करून व जलसंपदा विभागाचे नावे खरेदी दस्त देऊन आपले संपादित क्षेत्राची रक्कम मिळऊन घ्यावी असे आमदार बबनदादा शिंदे यांनी शेतकऱ्यांना कळवले आहे.
सीना माढा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याचे भू-संपादित कार्यक्षेत्रातील कुर्डू, तांबवे,व टेंभुर्णी परिसरातील संबंधित शेतकऱ्यांनी आपले संमती पत्रक, ७/१२ ,व ८- अ ऊतारा ,जलसंपदा विभाग पाटबंधारे कार्यालय भिमानगर, उपविभाग 1 व 2 यांचेशी संपर्क साधुन कागदपत्रे जमा करावीत, म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या संपादित क्षेत्राची रक्कम मिळण्यास कांही अडचण येणार नाही – रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता व धरण विभाग व्यवस्थापक, भिमानगर ता.माढा जि.सोलापूर