गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत; गर्दी केल्यास कठोर निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 3 : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत, मात्र नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जि.प.अध्यक्ष निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार गिरीश बापट, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार मुक्ता टिळक तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजाज ट्रस्टने दीड लाख लस दिली, हे कौतुकास्पद आहे. स्वयंसेवी संस्थांचे अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश आले आहे. खाजगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. महानगरासह ग्रामीण भागात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.