ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर आकाशवाणीचे संध्याकाळचे प्रसारण उद्यापासून पूर्ववत;श्रोत्यांना पुन्हा स्थानिक कार्यक्रमांची मेजवानी

 

 

अक्कलकोट, दि.२० : अतिरिक्त महासंचालक मुंबई यांनी सोलापूर केंद्राला संध्याकाळच्या प्रसारणाची अनुमती दिली आहे.रविवार दि.२१ मे पासून हे प्रसारण नियमित सुरू होणार
आहे.यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.१ जुलै २०२२ पासून अतिरिक्त महासंचालक आकाशवाणी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रांच्या स्थानिक प्रसारणामध्ये काही बदल करण्यात आले होते.यामध्ये स्थानिक केंद्रांची संध्याकाळची सभा स्थगित करून त्या ऐवजी मुंबई केंद्राचे आणि विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जात होते. या निर्णयामुळे सोलापूर आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या दर्जेदार कार्यक्रमांना श्रोत्यांना मुकावे लागत होते. शिवाय न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ॲपवरून जगभरातील श्रोते आकाशवाणीचे कार्यक्रम ऑनलाईन ऐकत असतात.संध्याकाळच्या सत्रातील कार्यक्रम बंद झाल्याने या सर्व श्रोत्यांनाही सोलापूर आकाशवाणीच्या आवडीच्या कार्यक्रमांना मुकाव लागत होते. आकाशवाणीचे सोलापूर केंद्र हे दर्जेदार कार्यक्रमांच्या निर्मिती बरोबरच जाहिरातीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न देणाऱ्या केंद्रांपैकी एक आहे त्यामुळे सोलापूर आणि परिसरातील जाहिरातदारांनाही संध्याकाळच्या सत्रात आपल्या उत्पादनाची जाहिरात करता येत नव्हती.या सर्वांचा विचार करता सोलापूर आकाशवाणी केंद्रातील अधिकाऱ्यांनी संध्याकाळचे प्रसारण केंद्राला मिळावे यासाठी प्रशासकीय दृष्ट्या प्रयत्न केले होते तसेच सोलापुरातील लोकप्रतिनिधींनी ही यासंदर्भात प्रसार भारतीकडे पाठपुरावा केला होता त्याचाच परिपाक म्हणून अतिरिक्त महासंचालक मुंबई यांनी सोलापूर केंद्राला संध्याकाळच्या प्रसारणाची अनुमती दिली आहे. त्यामुळे रविवारपासून हे प्रसारण नियमित सुरू होणार आहे,अशी माहिती कार्यक्रम विभाग प्रमुख राजेंद्र दासरी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.या निर्णयामुळे सोलापूर आकाशवाणीचे हॅलो आपली आवड,सुनो तराने क्विझ के बहाने,
प्रतिबिंब, हॅलो फोन गाणी, हॅलो शंका समाधान, गुलदस्ता यासारखे लोकप्रिय कार्यक्रम श्रोत्यांना पुन्हा ऐकता येतील,असेही ते म्हणाले.दरम्यान स्थानिक कार्यक्रमांना अनुमती दिल्यामुळे सोलापूरच्या श्रोत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानिमित्त आकाशवाणी केंद्रात एका छोटेखानी कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने आनंद सोहळा पार पडला.यावेळी हे कार्यक्रम पुन्हा
सुरू व्हावेत म्हणून अनेकांनी प्रयत्न केले.त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख अर्चिता ढेरे, प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, प्रकाश भांबुरे, निवेदक अभिराम सराफ, जयश्री पुराणिक आदी उपस्थित होते. नितीन बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले.

श्रोत्यांकडून
निर्णयाचे स्वागत

आकाशवाणीच्या या निर्णयाचे श्रोत्यांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.या निर्णयामुळे स्थानिक कार्यक्रमांबरोबर आकाशवाणीची लोकप्रियता कायम राहणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून यासाठीच पाठपुरावा सुरू होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!