सोलापूर जिल्हा परत काँग्रेसमय होईल; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा.अशोक निंबर्गी यांचा भाजपला राम राम !
सोलापूर, दि.२१ : कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. त्यात आगामी लोकसभेचे उमेदवार हे काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदेच असतील अशा प्रकारचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले. या मेळाव्याला राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या मेळाव्यात काँग्रेसने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका केली व भाजपच्या विद्यमान खासदारावरही टीका करायला ते विसरले नाही. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यासाठी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,गटनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री अस्लम खान,नसिम खान, अस्लम शेख,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ,आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी ,माजी आमदार रामहरी रुपणवर, शहर अध्यक्ष चेतन नरुटे ,माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे,बाळासाहेब शेळके,अशोक देवकते,महिला काँग्रेसचे अध्यक्ष शाहीन शेख आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.लोकसभेमध्ये माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचे नेतृत्व करावे आणि सोलापूर जिल्हा परत काँग्रेसमय होईल हा निर्धार सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी केला आणि मान्यवरांनी या निर्धार मेळाव्यास मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर शहर भाजपचे माजी अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.