सोलापूर : प्रतिनिधी : उजनी ते सोलापूर दुहेरी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम तत्काळ सुरू करा, अशा सूचना संबंधीत ठेकेदाराला दिल्या आहेत.महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयात शुक्रवारी महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटी कंपनी, नॅशनल हायवे आणि बीएसएनएलच्या अधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत सदरचा निर्णय झाल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
उजनी ते सोलापूर दुहेरी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नॅशनल हायवेच्या जागेतून जाणार आहे. बीएसएनएलचे नेटवर्क देखील याच ठिकाणाहून गेले आहे. दुहेरी पाईपलाईनचे खोदकाम केल्यामुळे बीएसएनएल डिफेन्स नेटवर्क बंद पडण्याची शक्यता आहे, अशी शंका उपस्थित करून सदरच्या कामाला हरकत घेतली होती. एकीकडे निधीमुळे काम बंद असलेल्या या कामात आणखी अडथळा वाढला होता. या पार्श्वभूमीवर सदरची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सदरच्या हरकतीवर चर्चा झाली. यावेळी नॅशनल हायवेकडून बीएसएनएलला पत्र पाठवले असून या कामात कुठेही अडथळा येवू नये, असे सांगितले आहे. यामुळे पुढील काम सुरू होण्याचा अडथळा दूर झाला आहे. स्मार्ट सिटी कंपनीला विनाविलंब काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीस नॅशनल हायवेचे संजय कदम, बीएसएनएलचे वैभव कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते.