श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दहाव्यांदा विक्रम खेलबुडे तर सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा समाधान वाघमोडे
सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दहाव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा समाधान वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी सरचिटणीस समाधान वाघमोडे यांनी मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले, त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मावळते खजिनदार संतोष शिरसट यांनी वार्षिक जमा- खर्च सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुमताने विक्रम खेलबुडे यांनी प्रवीण संकपाळ यांचा 118 मताधिक्याने पराभव केला. एकूण 122 जणांनी मतदान केले. यामध्ये खेलबुडे यांना 120 तर संकपाळ यांना 2 मतांवर समाधान मानावे लागले. विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षपदासाठी किरण बनसोडे यांनी सूचना मांडली तर त्यास प्रमोद बोडके यांनी अनुमोदन दिले. विक्रम खेलबुडे यांनी अध्यक्षपदाची दशक वर्षपूर्ती करत इतिहास घडविला.
तर सरचिटणीस पदासाठी झालेल्या निवडणुकीत समाधान वाघमोडे यांची बहुमताने फेरनिवड झाली आहे. वाघमोडे हे 60 मते मिळवून विजयी झाले. या पदासाठी एकूण 81 जणांनी मतदान केलं होतं. त्यामध्ये अजित उब्रजकर यांना 9 मते , चंद्रकांत मिराखोर यांना 8 तर भरतकुमार मोरे यांना 4 मते मिळवता आली.
पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबविले. येणाऱ्या काळात पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार आहे. सर्वांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली.
सर्वांनी सोपविलेली सरचिटणीसपदाची जबाबदारी नेटक्या पद्धतीने पार पाडणार असल्याची ग्वाही देत समाधान वाघमोडे यांनी सर्वांचे आभार मानले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार ऍड. राजकुमार नरोटे व अजित सांगवे यांनी काम पाहिले निवडीनंतर अध्यक्ष व सरचिटणीस यांचा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच दैनिक सुराज्यचे संचालक संपादक राकेश टोळे, बी.आर न्यूज चॅनलचे संपादक मनीष केत यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व सरचिटणीस यांचा सन्मान करण्यात आला.
आयत्या वेळी पत्रकारांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.