बारामती तालुक्यातील सोमेश्वर कॉलेजला शरद पवारांचे नाव, कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी घेतला आक्रमक पवित्रा
बारामती : बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणावर शेतकरी कृती समितीने आक्षेप नोंदवत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. अध्यक्ष सतीश काकडे यांनी नामांतराला विरोध केला आहे.
शरद पवार यांनी पवार ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण संस्थेला तीन कोटी रुपये दिल्याने या कॉलेजला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार यांचे नाव दिले. कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी कॉलेजचे पूर्वीचेच नाव महाविद्यालयाला बहाल करण्यास सांगितले आहे.
काकडे म्हणाले की, आमचा शरद पवार यांच्या नावाला विरोध नाही. पण संचालक मंडळाने आधी आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. पवार कुटुंबियांचा कारखान्याशी संबंध नसताना त्यांचं नाव का द्यायचे, असे देखील काकडे म्हटले आहे. शरद पवारांनी ट्रस्टच्या माध्यमातून कोटी रुपये दिले म्हणून त्यांचं नाव द्यायचं का असा सवाल काकडे यांनी केला आहे. हे नाव काढले नाहीतर उच्च न्यायालयात दाद मागू असे देखील काकडे यांनी म्हटले आहे.