सोलापूर : लोकांचा काटा काढणे, त्यांची घरे मोडणे यासारखी दृष्टी विरोधकांची आहे. त्यांच्याकडून कुणालाही मदत करणे शक्य झाले नाही. त्यांचे मूळ रक्तच विकासकामांचे नसून सुडाचे असल्याची टीका आमदार सुभाष देशमुख यांनी नाव न घेता माजी आमदार दिलीप माने यांच्यावर केली.
पाकणी ते तेलगाव या साडेचार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन तिन्हे (ता. उत्तर सोलापूर) येथे आ. देशमुख यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारत जाधव, राम जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, पाथरीचे उपसरपंच श्रीमंत बंडगर, शिवणीचे सरपंच प्रशांत राठी, राजू सुपाते, विशाल जाधव, उपकार्यकारी अभियंता रोहित जेऊरकर आदी उपस्थित होते.
आ. देशमुख पुढे म्हणाले, मागील महिन्यात येथील ब्रिज कम बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन आपण केले. त्यावेळी विरोधकांनी त्याचे भांडवल करत या कामासाठी आम्ही निधीच देणार नसल्याचे सांगितले. मात्र या कामाला कोणाकडून निधी मिळतो, याची कल्पनाच त्यांना नाही. शेतकऱ्यांचे हित होत असेल तर विरोधकांच्या घरचा निधी द्यायचा आहे का? असाही सवाल त्यांनी केला. यावेळी आ. देशमुख यांनी पाकणी येथूनच शिवणी ते तेलगाव, डोणगाव मार्गे विजापूर रोडकडे जाण्याचा नवीन बायपास तयार करण्यासंदर्भात माहिती गोळा करण्याच्या सूचना उपकार्यकारी अभियंता जेऊरकर यांना यावेळी दिल्या. भारत जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी काशिनाथ कदम, श्रीमंत बंडगर यांचीही भाषणे झाली.