अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर वर्धापन दिनानिमित्त नाथ षष्ठी व लक्ष्मण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त गुलालाचा कार्यक्रम व विविध भजनी मंडळाने सादर केलेले भजन हे लक्षवेधी ठरले. गेल्या वर्षापासून कुरनूरनगरीमध्ये ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला.
सकाळी श्री दत्त मूर्ती अभिषेक करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दुपारी बारा वाजता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गुलालाच्या कार्यक्रमात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर अक्कलकोट येथील समाधी मठाचे वेदशास्त्र संपन्न श्री आणू महाराज पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद गुरुजी व गावातील सर्व भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला.
दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक दत्त भक्तांचे सहकार्य लाभले.मुख्य लक्ष्मण शक्ती सोहळयाला सायंकाळी सहा वाजता प्रारंभ झाला. यात भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय ४३
ते ४९ वाचन व प्रवचन करण्यात आले. यावेळी पहाटे पर्यंत अक्कलकोट, सांगवी, काळेगाव, कोळेकरवाडी, मोट्याळ, बावकरवाडी, हसापूर, दहिटणे, निलंगा, आष्टा कासार, चुंगी, कुरनूर आदी गावातील सर्व वाचक, प्रवचक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, श्री दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, ह.भ.प बाबू शिंदे महाराज, युवा नेते राहुल काळे, उत्सव
समितीचे अध्यक्ष भागवत पोतदार, उपाध्यक्ष अशोक काळे, सचिव भीम कुंभार, परशुराम बेडगे, तुकाराम जावीर, वेदमूर्ती आणया स्वामी, बालाजी मोरे, माणिक जगताप, तानाजी शिंदे, पुजारी धोंडिबा धुमाळ, सुरेश बिराजदार, अप्पू काळे, मदार शेख, अर्जुन मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.