प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक; राज्यातील समस्या, संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांवर विचारमंथन
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी एच. के. पाटील तसेच ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आशिष दुआ, सोनल पटेल, आमदार, खासदार व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आघाडी संघटनांचे प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महागाई, बेरोजगारी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्ट कारभार, आगामी विधान परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यासाठी पक्षाची रणनिती, भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्याबाबत तसेच हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे