ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डिजिटल मीडियावरील नियमावलीबाबत राज्य सरकार सकारात्मक : चंद्रकांत पाटील

भिलार येथे पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन

मारुती बावडे

भिलार, दि.२९ : समाज माध्यमे ही राज्यकर्त्यावर अंकुशा प्रमाणे हवीत. चुकीचे असेल तर प्रहार आणि खऱ्याचा पुरस्कार करणारी पत्रकारारिता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शनिवारी, भिलार ( महाबळेश्वर ) येथे आयोजित राज्यातील डिजिटल मीडिया संपादक राज्य पत्रकार संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या अधिवेशनात राज्यातील डिजिटल मीडियाचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले,राज्यात डिजिटल मीडियाचा प्रसार झपाट्याने होत आहे. हे नाकारून चालणार नाही.त्यासाठी राज्य सरकार पण त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक होऊन विषय मार्गी लावले जातील. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू असलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. कुणाचीही शिवराळ वक्तव्य या माध्यमावर न दाखवु नये.त्यांनी फक्त कडक शब्दात टीका केली अशा प्रकारचा उल्लेख डिजिटल माध्यमानीं करावा, असेही ते म्हणाले.

मंत्री दीपक केसरकर यांनी वृत्तपत्रसृष्टीचा इतिहास सांगताना कसे बदल होत गेले. खिळे जुळवून सुरू झालेली पत्रकारिता आज डिजिटल युग आहे. पत्रकारितेचे पुढे काय येईल हे सांगता येत नाही मात्र नव्या डिजिटल पत्रकारिते संदर्भात सर्वांशी विचार विनिमय करून योग्य तो मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.स्वागताध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी डिजिटल पत्रकारिता व्यापक आणि तत्पर झाली असली तरी बातमी देताना शाहनीशा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या अधिवेशनाला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, जयकुमार गोरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पालकमंत्री देसाई यांनी मनोगतातून केले.

शासनाने डिजिटल पत्रकारांना येणाऱ्या काही अडचणी नमूद केल्या. या संघटनेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवू. सरकारने डिजिटल मीडियाला देखील अधिस्वीकृतीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याध्यक्ष राजा माने यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र महागौरव २०२२ पुरस्कार सोलापूर येथील मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे यांना तर विशेष राज्यस्तरीय पुरस्कार सोलापूरचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी कक्षाचे मंगेश चिवटे, सांगोल्याचे मुख्याध्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह अनेकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

या अधिवेशनाचे आयोजन सातारा जिल्हा संघटनेने केले होते. पुढील अधिवेशन लातूर येथे घेण्याचे निमंत्रण यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल मीडियाद्वारे शुभेच्छा संदेश दिला. यावेळी सोलापूरसह राज्यभरात डिजिटल मीडियात काम करणारे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!