ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“विद्यार्थी सर्वांगीण विकास प्रकल्प” राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविणार -सर फाऊंडेशन व आय एम द वन संस्थेचा पुढाकार

सोलापूर – शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “विद्यार्थी सर्वांगीण विकास प्रकल्प ” राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम शालेय स्तरावरील पहिली ते बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अमलबजावणी साठी सर फाऊंडेशन व आय एम द वन (imd1 ) या दोन्ही संस्था मध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पातून येत्या तीन वर्षात दहा लाख शालेय विद्यार्थी यांना याचा लाभ करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन सर फाऊंडेशन च्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त करण्यात आले. या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आय एम द वन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीगिश सोनागरा, संचालक संदीप दोशी, सर फाऊंडेशन राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ व महिला राज्य समन्वयक श्रीमती हेमा शिंदे हे उपस्थित होते.

या प्रकल्पाबाबत बोलताना श्रीसोनागरा म्हणाले की, हा प्रकल्प अनेक अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्याची संधी यात देण्यात आली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यातून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा मुख्य हेतू आहे. आपल्या आवडीच्या कलाचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी घेऊ शकतात. संगीत, कला, नृत्य, क्रिडा, आर्थिक साक्षरता, जीवनमूल्ये व आदर्श नागरिकांची मूल्ये या बाबत नामांकित व्यक्ति मार्गदर्शन करणार आहेत. विविध संस्था, कंपन्यांचे सीएसआर व ब्रँड यांना सोबत घेऊन हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासनाच्या शिक्षण विभाग सोबत घेऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे.

यावेळी सिद्धाराम माशाळे म्हणाले की, विद्यार्थी सर्वांगीण विकास प्रकल्प च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर विषयाचे ज्ञानही आवश्यक आहे. क्रीडा, संगीत, नृत्य, कला, जीवन मूल्य हे आपल्या जीवनाचे महत्त्वाचे अंग आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विविध गोष्टी ऑनलाइन पद्धतीने शिकण्याची संधी यातून मिळणार आहे. ही संधी राज्यातील सर्व व्यवस्थापनातील शालेय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी हा प्रयत्न आहे.

सर फाउंडेशन अर्थात स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन हे प्रयोगशील शिक्षकांचे देशातील विशाल नेटवर्क आहे. सोलापूरहून देशभरातगुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. टीचर इनोव्हेशन, अविष्कार, प्रिसिजन ई-लर्निंग प्रोजेक्ट, माझी शाळा गुणवत्तापूर्ण शाळा, नॅशनल लेवल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स, विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा, कोविड काळातील शिक्षण, शिक्षकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा अशा अनेक प्रकल्पात या संस्थेने कार्य केले आहे. राज्यभरात सुमारे 60 हजार प्रयोगशील शिक्षक त्याचे सदस्य आहेत. आयडिया टेक्नोव्हेशन द्वारा संचलित आय एम द वन (imd1 ) होलिस्टिक डेव्हलपमेंट हब आहे. या क्षेत्रातील नामांकित असणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध तज्ञांचे माध्यमातून अनेक ऑनलाईन कोर्स तयार केले आहेत. देशभरातील नामांकित संस्था व शाळेतील विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. आता सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी आय एम द वन आणि सर फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला असून देशभरातील दहा लाख शालेय विद्यार्थ्यांना येत्या दोन-तीन वर्षात त्याचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

या ऑनलाईन उद्घाटन समारंभास सर फाउंडेशन सोलापूर जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण, नवनाथ शिंदे आणि अनघा जहागीरदार, आय एम द वन संस्थेचे ऑपरेशन हेड चंद्रेश भट, टेक्नोव्हेशन हेड जैनम व्होरा, इम्पलेमेंटेशन हेड पराग बांबुळकर आदी मान्यवर यांच्यासह सर फाऊंडेशन च्या विविध जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!